स्त्री मनाच्या अंतर्बाह्य वेदनेची संघर्षमयी कविता
———————————————————-
छाया कोरेगावकरांच्या कवितेद्वारे व्यक्त झालेली स्त्री वेदना केवळ गृहीतकांच्या नव्हे तर अनुभूतीच्या आधारे व्यक्त झालेली तसेच त्यांच्या स्त्रीप्रधान मनाच्या विचार विश्वातल्या कंगोर्यांचा सूक्ष्मतेने परामर्श घेताना किंवा व्यक्त होताना त्यांच्या ‘सहाव्या बोटाचा हिरवा कोंब ‘ या संग्रहात सतत जाणवते. या व्यक्त होण्यातूनच त्या आजपर्यंत संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली आपले स्त्रीच्या स्त्रीत्वावर लादलेले बंधनाचे आणि परावलंबित्वाचे आवरण भेदू पाहतात.
पडू नये पाऊल वाकडं
म्हणून पायच छाटणार्या संस्कृतीची झूल
पांघरताहेत बायका वर्षानुवर्षे
रांगोळीच्या नक्षीतून गिरवताहेत
पिढ्यांपिढ्या परंपरेच्या रेघोट्या
(लिंगभेद)
हे जरी असले तरी एक कवयित्रि म्हणून समाजाप्रत असलेली आदरयुक्त समर्पणाची भावना त्या राखून आहेत हेही तितकेच खरे आहे. या आदरयुक्त समर्पित भावनेतही त्यांचा आंतरिक वैचारिक तत्व संघर्ष न चुकता डोकावतो.
ती जिव्हाळते सार्याच
सजीव–निर्जीव वस्तूंना
सराईतपणे सरसर ओवते
नात्यागोत्याची माळं
तेव्हा निसटून जातो
आत्मभानाचा मोती
तिच्याही नकळत
तक्रारीला उसंत मिळू नये
इतकी भिरभिरते ती संसाराच्या भोवर्यात
(सातबारा)
! क्रोधमय संघर्ष हा स्त्रीच्या जन्मजन्मांतरीच्या वेदनेचा स्थायीभाव! त्यातही सय्यम हा तिच्या वैचारिकतेचा उपजत बांध
किंवा उपसून काढता येतो तळ
बाई नावाच्या जुनाट विहीरीचा
(निर्णय )
या वैचारिकतेत या बांधातूनच तिची सर्जक प्रवृत्तीची कविता ओघवत राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसते व मुक्तिची आस धरते व प्रोत्साहित करते. किंबहुना त्यातच तिच्या नव्या बदलाला ती साद घालताना दिसते.
सेल होत जाते हळू हळू काळ्या पोतीची वेसण
घर नावाच्या चौकोनी परिघातला केंद्रबिंदू
ढकलतो आपल्या मुळाना
आपल्या खर्याखुर्या मातीकडे तेव्हा
चिमण्या घरट्यातल्या वादळवार्यांना
थोपविणार्या माझ्या पदराला
पुन्हा एकदा ठरवाव लागतं
युद्ध नको म्हणून फडकावायचा पदर
तहाच निशाण म्हणून
की उभरायचा बंडाचा झेंडा !
(निर्णय)
पारंपरिक स्त्री ला तिच्या कोषातुन बाहेर काढून जागतीकी
करणाच्या सर्वंकष जगासमोर आणून तिला या नव्या प्रवाहात सामील करण्याला कोरेगावकरांची कविता सतत प्रवृत्त करते. तसा आग्रहही धरते.तसेच तिला स्वयंभू बनवण्याचा प्रयत्नात त्या सांगतात–
वाट पाहू नकोस कोणत्याच ज्योतिबाची
तुझी तूच हो सावित्री
आणि
लिहून काढ
एक नवी बाराखडी
(मैत्रिणी)
अर्थात याचे सारे श्रेय त्यांनी आपल्या अर्पण पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे क्रांति ज्योति सावित्रीबाई आणि ज्ञान सूर्य बाबासाहेब आंबेडकर यांचेच आहे. त्यांचाच वैचारिकतेचा वारसा त्यांच्या ठायी आहे हे निर्विवाद दिसून येते. भले त्यांच्या कवितेवर उर्दू शायरीचा नकळत प्रभाव असला तरीही उपजत सय्यमाचा बांध त्वरित त्यांना आपल्या मूळ प्रवाहात अलगद सामावून घेतो व त्यांची कविता अधिक समृद्ध करतो. कारण त्यांच्या कवितेत स्त्रीत्व आणि संस्कृती बरोबरच असलेलं समाज भान त्यांना समाजापासून अलिप्त ठेवू शकत नाही.
कविता कधीच नसते भाकरीचा पर्याय
पण
कवितेशिवाय भाकरीलाही
चव नसते हेही तितकच खरं आहे.
(कविता आणि भाकरी)
तर समाजातल वास्तव निरीक्षण नामदेवा(ढसाळ),जोतिबा,हे ज्ञानसूर्या,निर्भया,व्हायरस आदि कवितांमधून त्या करताना दिसतात.
आताशा तुम्हीही कडेकोट बंदोबस्तात असता
दंगलीच्या भीतीने
तिकडे आपल्याच बडव्यानी
तुमचं देऊळ बांधण्याचा
घाट घातल्यापासून,
मी गस्त घालत उभी आहे
रात्रंदिन तुमच्या स्मारकापुढे
तुम्हीच दिलेलं संविधानाच
मर्मभेदी हत्यार उपसून!
(मी उभी आहे )
अशी ही स्त्री वेदनेची,तिच्या ताण्याबाण्यासह फुलणारी,अनेकविध कंगोरे उलगडणारी कविता स्त्री च्या भावविश्वाला निश्चित न्याय देऊ शकेल अशी विश्वासार्हता उत्पन्न करते. याची खात्रीपूर्वक आपण ग्वाही देऊ शकतो.
—-प्रसाद सावंत
‘सहाव्या बोटाचा हिरवा कोंब’
कवयित्री : छाया कोरेगावकर
संवेदना प्रकाशन,पुणे
पृष्ठे : ८०
मूल्य :रुपये १५०/–
शेअर करा..