देशाचे भेदक प्रतिबिंब दाखवणार्या कविता
“मी देशाचा सातबारा लिहिन म्हणतो ”
कविवर्य रमेश सावंत यांचा पाचवा कवितासंग्रह “मी देशाचा सातबारा लिहिन म्हणतो “नुकताच प्रसिद्ध झाला आहे.निसर्गावरील उत्कट प्रेम ,समाज वास्तवाचे भान असणार्या सामाजिक बांधीलकीच्या कविता ,माणसाच्या स्वभावाच्या अनेकविध पैलूंचे मानसशास्त्र हे सारे बारकाईने पाहून त्यावर भाष्य करीत व्यक्त होणारा हा कवी.या पाचव्या संग्रहाच्या अनुषंगाने सावंत सातबारा लिहिण्याच्या उद्धेशाने व्यापक दृष्टीकोणातून आपल्या भावनांना अभिव्यक्त करू पाहतात.सातबारा म्हणजे देशाचा जणू ते आरसाच आपल्यासमोर ठेवून या देशाचे विदारक,भेदक,तर प्रसंगी हळव्या,तरल संवेदनक्षम मनाने वास्तव चित्रण उभे करू पाहत आहेत असे दिसते . या संग्रहात एकूण बावन्न कविता आहेत. यातील प्रत्येक कवितेतून ते समाज व्यवस्थेवर व त्यामुळे निर्माण होत असलेल्या व तद अनुषंगाने विस्कटलेल्या जीवनावर भाष्य करू पाहतात. प्रसंगी माणसाच्या अस्तित्वावरच घाला घालू पाहणार्या समाज चौकटीचाच ते सातबारा लिहू पाहतात. त्यातील विकासाच्या रूपाने आणलेले किंवा मांडलेले भ्रामक फेरफार अधोरेखित करू पाहतात. जसे –
झपाटल्या प्रगतीच्या आवेशाने
गिळून टाकतो हा विकास
गावच्या वळणदार वाटाना
नदीवरल्या बेवारशी घाटांना
अन घरांच्या विटानाही (विकासाच्या शोधात )
तर या सातबारात काही टीप लिहून संदर्भ जोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कवीला ही व्यवस्था आपल्या ताकंदीच्या जोरावर माणसाला झिडकारण्याचा उपद्व्याप करताना कवीला जाणवते तेव्हा साहजिकच त्याचा उद्वेग होतो.जसे कवी लिहितो —
आसमंतातले दोनचार शब्द उधार घेऊन
कोणता अपराध केला होता मी ?
केवळ एक कविताच तर लिहिली होती (माझ्या कवितेच्या राखेतून )
मग त्याच्या अंतर्मनातील एल्गार स्फुंदून आक्रोश करताना दिसतो. अस्मितेच्या नावाने व्यवस्थेचे रखवालदारच जेव्हा संस्कृतीचे खच्चीकरण करताना दिसतात तेव्हा कवीची तगमग वाढून तो विलापी विद्रोह करतो. जसे
पण नाही फसणार आम्ही
बोडक्या विकासाची स्वप्ने पाहत
कारण ते फिरवू पहातायत नांगर
आमच्या शेत ,शिवार अन घरादारावर (गाथा आमच्या जगण्याची)
सावंतांनी या सातबाराच्या अनुषंगाने थेट राजकीय हल्ला टाळून विटाळीत मानवी संस्कृती,विस्कळीत समाज व्यवस्था,
धर्मांधतेचे बोकाळलेपण यावर प्रामुख्याने भाष्य करून सजग नागरिकतेच्या भावनेतून त्याचा ऊहापोह केलेला दिसतो. शिवाय आता तर अभिव्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याची गळचेपीहि कवीला नामंजूर आहे. शिवाय त्यातून इतिहासाच्या घटनांची
कल्पकतेने तोडामोड करून आपल्याला अभिप्रेत असे सोयिस्कर भ्रामक परिमाणे देऊन वास्तव उभे करण्यावरही कवी सातबारात या नोंदी करून ठेवू इच्छितो .
का कुणास ठाऊक पण
आजवर त्यांना भीती वाटत होती
आमच्या धारदार लेखणीची
आणि कधीकधी तर
आमच्या फटकळ तोंडातून निघणार्या
स्पष्ट आणि मुक्त विचारांचीही
पण आता ते घसरलेत
आमच्या मेंदूत सेव्ह झालेल्या पुस्तकांवर (मुक्तिचे गीत )
मुळात कवी मानवी मनाच्या बाबतीत संवेदनक्षम असला तरी प्रसंगी निसर्ग नियमांनुसार अन्यायाप्रती उपजत आक्रमक पवित्रा घेताना दिसतो. धार्मिक व्यभिचार,अनिष्ट रीतीरिवाज,धर्मांधता याने त्याचे मन व्यथित होते.आक्रोशते आणि प्रसंगी आपले शब्दांचे हत्यार घेऊन हल्ला करू पाहते. माणसाला माणुसकीच्या भावनेतून न पाहणार्या,धर्माच्या नावाने बोकळणारी
असमानता आणि माणसाच्या अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजांपासून वंचित ठेवणार्या व्यवस्थेचा हा सातबारा आहे.असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
नाही टांगता येत भुकेला
भिंतीवरील खुंटीवर
भूक मात्र टांगते माणसाला
जगण्याच्या झुल्यावर (भुकेची बाराखडी )
या सातबाराच्या नोंदी माणसातल्या माणसाला जागे करायला,नव्या फेरफरसकट नव्या कुळासाठी संदर्भ म्हणून पुरेशा आहेत असे मला वाटते.
—-प्रसाद सावंत
” मी या देशाचा सातबारा लिहिन म्हणतो “
काव्यसंग्रह
कवी रमेश सावंत
अष्टगंध प्रकाशन,ठाणे
पृष्ठे :६४
मूल्य १५० /-
शेअर करा..