नाती अशी आणि तशीही – ०३

नेहमीप्रमाणे सावलीत अ‍ॅडमिशन चालू होती. सत्तरीतील मोरे आजोबा-पॅरोलेसीस झालेले. नेहमीप्रमाणेच रुग्णाबरोबर 4-5 नातेवाईक त्यात एखादी महिला असं दृष्य होत. आमचे पि.आर.ओ. अ‍ॅडमिशनची प्रोसेस पुर्ण करत होते. मला वेळ होता त्यामूळे सहज त्यांच्यात जावून बसलो. आणि जाणवलं ही जरा वेगळी केस होती. अ‍ॅडमिशन करायला आलेले लोक रुग्णाचे नातेवाईक नव्हते. तो ज्या शेतावर कामाला होता त्या शेताचे मालक होते. एखाद्या मालकाने त्यांचा नोकर आजारी पडला असता पैशाच्या रुपात मदत करणे मी समजू शकतो. पण इथे मालकाचं संपुर्ण कुटुंब त्याची काळजी घेताना दिसत होतं.

मोरे आजोबा गेली अनेक वर्ष भोसल्यांच्या शेतावर राखणदार-मजूर म्हणून कामाला होते. मोरे पती-पत्नीला अपत्य नव्हतं. शेतावर पडेल ते काम करणे आणि शेतावरच्याच घरात राहणे हा त्यांचा दिनक्रम. दोनच वर्षांपूर्वी मोरे आजी लहानश्या आजाराने वारल्या. त्यानंतर मोरे आजोबा एकटेच त्या घरात राहू लागले. त्यांचा स्वयंपाक त्यांचे ते करायचे पण साहजिकच खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. अशातच त्यांना पॅरालेसीसचा तीव्र झटका आला. जवळपास 8-9 तास ते त्याच अवस्थेत पडून होते. सकाळी दुसरे मजूर गेल्यानंतर धावाधाव झाली आणि त्यांना हॉस्पीटलला अ‍ॅडमिट केलं. दाखल करायला उशीर झाल्यामूळे व्हायचे ते नुकसान झालेच. हॉस्पीटलमध्ये महिनाभर प्रयत्न करुनही म्हणावा तसा फरक पडेना. यापूढे किती दिवस हॉस्पीटलला ठेवणार? घरी नेणेसुद्धा शक्य नाही. म्हणून सावलीमध्ये दाखल करण्याचा विचार झाला.

आमच्या डॉक्टरांनी मोरे आजोबांना तपासले. तब्येत फार आशादायक नव्हती. एक हात आणि पाय अजिबात हलवता येत नव्हते. आधार देऊन चालवण्याचा प्रयत्न केला तर पुर्ण भार अंगावर टाकायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फारशी जीवनेच्छा उरली नव्हती. भोसले म्हणाले, “आपल्याला जे काही करणं शक्य आहे ते सर्व करायचं. पैशाची काळजी करु नका.” सख्या भावान न ओळखणार्‍या जगात एका मालकाने आपल्या शेतमजूरासाठी हे करणं जरा वेगळचं होत. माझ्या मनात भोसलेंबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला.

महिना झाला. आता मोरे आजोबा सावलीत स्थिरावले होते. चांगल्या आहारव्यवस्थेमूळे, सुश्रुषेमूळे चेहर्‍यावर तजेला आला होता. चालण्याचा प्रयत्न ते स्वत:हून करु लागले होते. एकंदरीत प्रगती चांगली दिसत होती. भोसले समाधानी दिसले. त्यांचा रुग्ण सावलीत ठेवण्याचा निर्णय योग्य ठरु लागला होता. पुढील महिन्याचे पैसे भरताना परत त्यांनी आधीचेच वाक्य रिपिट केले.

दरम्यानच्या काळात सावलीच्या नुतन इमारतीचे उद्धाटन झाले. अत्यंत अद्ययावत असे फिजिओथेरपी युनिट कार्यन्वित झाले. आणि आम्ही मोरे आजोबांना नविन इमारतीमध्ये शिफ्ट केले. अद्ययावत मशिनरी, कुशल मनुष्यबळ, उत्तम वातावरण, नविन इमारत सगळ्याचा एकत्रीत परिणाम लवकरच दिसू लागला. मोरे आजोबा बघताबघता वॉकरच्या सहाय्याने चालू लागले. बोलण्या-वागण्यात उत्साह दिसू लागला. पुढील चार महिन्यात तर ते वॉकरविनाच चालू लागले.

स्वत:च्या तब्येतीच्या कारणामूळे आणि नंतर घरात लग्नकार्यामूळ भोसलेंचे सावलीला येण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र मोरे आजोबांचे पैसे वेळच्यावेळी येत असत. आता मोरे आजोबा जिने चढउतारही एकट्याने आणि आत्मविश्वासाने करु लागले होते. डिसचार्ज घेतला तरी चालणार होता.

असेच एकदा पैसे भरायला आले असताना मी भोसल्यांकडे विषय काढला. ”आता मोरे आजोबा एकदम ठीक आहेत. तुम्हाला हवे असेल तर डिसचार्ज घ्यायलाही हरकत नाही.” त्यावर ते म्हणाले, “डिसचार्ज घेतला असता पण आता त्यांना शेतावर एकटे ठेवणं प्रशस्त वाटत नाही. परत काही झालं तर? त्यापेक्षा इथेच चार लोकांमध्ये राहूदे. तूमचं लक्षही असतं.” मी म्हणलं, “पण पैसे नाही का नाहक खर्च होत?” “ नाहक कसे? हे जे मी करतो आहे ना, ती मेहरबानी वगैरे नाही बरकां त्यांच्यावर! त्यांचा अधिकार आहे तो. इतकी वर्ष इमानेइतबारे आमचं शेत राखलं त्यांनी. आणि पगार असा किती देत होतो आम्ही. त्यांनी घरच्यासारखं सगळं राखलं आता आमची पाळी.” भोसले म्हणाले.

मोरेंच्या बाबतीत कर्मण्ये वाधिकारस्ते….. मी अनुभवत होतो.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments