पानिपत – अभिप्राय

आज पानिपत वाचून पूर्ण झाले.मराठ्यांनी केलेला पराक्रम वाचून डोळे भरून आले. पानिपतावर घडलेला पराक्रम वाचता वाचता सगळे प्रसंग दृष्टीपटलासमोर असे उभे राहिले की आपल्यासमोरच सर्व घडतेय असा भास व्हावा, यात सगळे लेखक विश्वास पाटलांचे यश.
ते (मराठे)पानिपतावर हरले, पण पाटील लेखणीत जिंकले!

प्रत्यक्ष काळ जरी समोर उभा राहिला तरी त्यावर पाय रोवून उभे राहतील असा पराक्रमी वीरपुरुष सदाशिवराव भाऊ, कोवळ्या वयात मृत्यूला सामोरे जाणारे विश्वासराव, पोटच्या पोरापेक्षा भाऊंवर जास्त प्रेम करणारे श्रीमंत नानासाहेब पेशवे, रणांगणावर पराक्रम करुन पित्याचे नाव सार्थ करुन दाखवणारा बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर, बचेंगे तो औरभी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे, मिसरुडही न फुटलेल्या वयात मरणापर्यंत भाऊंना साथ देणारा सरदार जनकोजी शिंदे, म्हातारपणातही तरुणाला लाजवेल अशी तडफ असणारे सरदार मल्हारराव होळकर, सरदार विंचूरकर, दीड लाख लष्कराला रसद पुरवता पुरवता सर्वस्व पणाला लावणारे गोविंदपंत बुंदेले, धन्यावरील नितांत श्रद्धा असणारा आणि आग ओकणार्या मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहीमखान गारदी, मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठीच जणू काही जन्म घेतलेला ईराणचा बादशहा दुर्राणी अहमदशहा अब्दाली, मराठ्यांचा काळ म्हणून उभे राहिलेले गिलचे, रोहिले, आलम दुनियेत शोधून सापडणार नाही असा धूर्त, कावेबाज आणि संधीसाधू नजीबखान उद्दौला अशी थोडीथोडकी नाही तर लाखो माणसे नजरेसमोर मूर्तीमंत उभी राहिली. शनिवारवाडा, यमुनेचे दुथडी भरुन वाहणारे पात्र, तिच्या काठचा तो सुपीक प्रदेश, दिल्लीचा लाल किल्ल्यावर फडकणारा भगवा जरीपटका, कुंजपुराचा विजय, आणि पानिपतावरचे मराठ्यांचे रक्त पिऊन पावन झालेले पुण्य रणांगण हे उभ्या आयुष्यात डोळ्यांसमोरुन जाणार नाही. माणसाच्या मृत्यूनंतरही फक्त त्याचे कर्मच जिवंत राहते ही उक्ती पानिपताच्या समरांगणाने सार्थ करुन दाखवली आहे. मेलेली मढी आता पुन्हा उकरुन काढण्यात काय उपयोग असे ज्यांना ज्यांना वाटते, त्या प्रत्येकाच्या घरातला कोणीतरी पानिपतावर खर्ची पडला आहे हे विसरुन चालणार नाही. झाडाची पाने आणि शाडू माती खाऊन प्राणपणाने लढलेल्या मराठ्यांचे रक्त ज्या रणभूमीवर पडले ती परमपवित्र माती मस्तकी लावून प्रेरणा घ्यावी आणि पानिपतावर मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा प्रत्येकाच्या मुखातून गायली जावी म्हणून हे लिखाण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!