पहाटेचे आवाज…

असं म्हणतात की प्रत्येक क्षणात, प्रत्येक वेळेत संगीत असत, आवाज असतो, रिदम असतो, काहीही म्हणा पण या पहाटेच्या आवाजाची गम्मतच वेगळी असते. पहाटेचे आवाज. रात्र सरल्याच्या जाणिवेची एक गाढ शांतता आणि दिवस सुरु होण्याची चाहूल याच आवाजात सापडते. पहाट म्हणजे उंबरठा वाटतो जो प्रत्येक जण रोज ओलांडतो. कळत नकळत. पहाटेचे आवाज. हायवेवरून खूप लांबुन येणाऱ्या भल्यामोठ्या ट्रकच्या चाकांचा सपासप वारा कापतानाचा होणारा आवाज आणि त्यातच गरज नसताना एखाद्या ड्राइवर ने डिप्पर मारला म्हणून चिडून दिलेल्या हॉर्नचा कर्णकर्कश्य आवाज. चहाच्या टपरीवरच्या स्टोव्ह ची वाढत जाऊन एका लयीत थांबलेली रिदमिक घरघर आणि त्यात चहावाल्याचे आणि त्याच्या गिहाईकांचे पेंगुळलेले आवाज. त्यातच एक हौशी बाईकस्वार सायलेन्सरला सोनीचा डॉल्बी सऊंड सिस्टिम चा आवाज लावून पहाटेची शांतता भंग करून टाकतो. एव्हाना दुधवालेही निघतात सायकल वर किंवा आपापल्या दुचाकीवर दुधाची भल्यामोठ्या किटल्या अडकवून. आधी या किटल्या जर्मन च्या असायच्या. ५० लिटर च्या. एकमेकांवर आदळल्या की छान नाद घुमायचा वातावरणात. मग सायकल च्या पँडलची आणि किटल्यांच्या आवाजाची अव्वल मेहफील रंगायची पहाटे पहाटे. आता या किटल्या प्लास्टिकच्या झाल्यात. त्यांचे आवाज उगाचच ते हनीसिंगच्या पाचकळ रीमिक्स सारखे वाटतात. कावळा ओरडताना देखील ऐकलंय मी अधून मधून. त्यातच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे इमानदार कुत्रेदेखील भर घालते. रस्त्यावरची कुत्री तर पहाटेच्या वेळी तंद्री लागलेली असली तरी उठून नव्या दमाने स्वतःच्या अस्तित्वाची ग्वाही देतात. त्यावेळी वाटत आपल्याला यांची भाषा समजत असती तर या रस्त्यावरच्या कुत्र्यांची एवढ्या पहाटे कुठल्या विषयावर टीम मीटिंग चाललीये हे पण कळलं असत. टिटवी जाते मग याच आवाजात थोडी भर टाकून. आई म्हणते, टिटवी ओरडलेली अशुभ असते. तीच ओरडन ऐकलं की तिला शिव्या द्यायच्या मग ती निघून जाते. तिच्या टिवटीवित आता माझ्या मौन शिव्यांची देखील भर पडू लागलीये. रेल्वे स्टेशनवर पहाट खूप जड झालेली असते. तो रेल्वेचा भोंगा सुद्धा उगाचच पेंगाळलेला आवाज देत असतो. बाकीच्या विक्रेत्यांची रेटून चाललेली कलकल सुद्धा मंद झालेली असते. हा पण ती अनाउन्समेंट वाली बाई मात्र तेवढ्याच हुरूपात बोलत असते. रेकॉर्डिंग दिवसा केलेलं असत कदाचित म्हणून. पहाटे पहाटे जाग आली की सगळ्यात आधी लक्ष्य वेधणारा आवाज म्हणजे वर फिरणाऱ्या फॅन चा आवाज आणि त्याच्या साथीला जर एखादा घोरणारा बहाद्दर असेल तर जमलं. हे दोन आवाज तुमच्या पहाटेच्या साखरझोपेत कधी मीठ कालवतील तुम्हाला कळणार देखील नाही. पाणी यायच्या आधी नळातून मासा तडफडतानाचा होणाऱ्या आवाजाची हीच ती वेळ. त्यावेळी ना तो नळ उगाचच एका सर्दी झालेल्या माणसासारखा वाटतो. रिवर्स मारतो, टॉप मारतो पण मटेरियल सगळं आतल्या आतच राहत. त्यातच एखादा ब्रेकअप झालेला प्रियकराला रात्री लौकर झोपल्यामुळे जाग येते आणि तो बिचार्या आठवणींवर दोष ठेऊन वीरहाच्या कवितांचे राग आळवायला लागतो. ते राग तसे मौनच असतात. अगदी दिवस उजाडायला लागला की या प्रेमवीरासोबत तेही निपचित पडून जातात. भर हिवाळ्यात या सगळ्या आवाजात भर पडते ती दत्ताच्या मंदिरात चाललेल्या काकड आरतीची. आईवडील काकड आरतीला गेले की मी तो आवाज न येण्यासाठी सगळ्या खिडक्या दारं घट्ट लावून घेताना मला कसलीही शरम वाटत नाही. तो आवाजही मोहवून टाकतो बऱ्याचदा – टाळ, मृदूंग आणि वीणेचा समेवर आलेला स्वर आणि जमलेल्या भाविकांचा पुंडलिकवरदेव हरिविठ्ठलाचा एकच झालेला नादः गावाला गेलो होतो तेव्हा पहाटे पहाटे अजाण चे स्वरदेखील ऐकलेत बऱ्याचदा. असं ऐकलंय की अजाण मुद्दामच एका लयीत किंवा एका सुरात म्हणत नाहीत किंवा त्याच्यासोबत वाद्यही वाजवत नाहीत (ज्यांना माहीत असेल त्यांनी स्पष्टीकरण द्यावे) पण त्या पहाटेच्या शांततेत तो नुसता आवाजसुद्धा कानाला छान वाटतो. असे एक ना अनेक आवाज घेऊन पहाट एखाद्या सालस मुलीप्रमाणे बहाल करते स्वतःला दिवसाकडे आणि स्वतःच अस्तित्व त्या दिवसाच्या नावे करून टाकते एखाद्या आज्ञाधारक बायकोसारखी! पण जरी दिवसाला दिले अस्तित्व तरी मुळे राहतात जखडून दिवसभर पहाटेची. रात्रीच्या भयाण शांततेचा राग आणि व्यवहारी दिवसांचे कोते स्वर यामधली पहाटेची मेलडी ऐकणं म्हणजे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. नाही का?

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments