गुलाबी थंडी

थंडी असते ग गुलाबी,
आठवणींच्या शिशिराला कसला आलाय रंग बिंग?
त्या येतात भल्या पहाटे रात्रीचा काळा-कुट्ट रंग घेऊन
नाहीतर, किर्र्रर्र रात्री निळ्या पहाटेची स्वप्न घेऊन.
त्यांना कुठे असते शिस्त, जगण्या बिगण्याची
भीती ही नसते त्यांना आडोशाला कुणी बघायची
त्या असतात ना स्वैर, मुक्त, अवखळ
रिकाम्या कॅनवास वर फ्री स्टाईल मध्ये शिंपडलेल्या रंगांसारख्या
त्यांना फक्त पाहत राहायचं बस्स…
येताना, जाताना – गुंतायचं नाही त्यांच्यात ..
त्यांच्यात गुंतलं की ते समोरच्याला आपलस करून सोडतात
आणि मग पूर्ण दिवसाचा बट्ट्याबोळ!
समोरच्याला स्वतःचा असा रंग उरतच नाही.
ते होतात फक्त आठवणींच्या रंगांचे….
आठवणींचा रंग तरी कुठला?
खारट आसवांचा..
खर तर्…हे सगळेच रंग आणि तुझ्या आठवणी अल्लड.
पाठलाग करून हातात येणार नाही
आणि मिठीत येऊन एकरूप झालं तरी कळणार नाही
एवढं स्वैर नसावं ग…
कधीतरी वाग तुझ्या आठवणींसारखं..
ये समोर त्यांच्यासारखीच कधीतरी, चाहूलही न लागू देता
कळू दे की मलापण, काय असतात रंगांचे अर्थ..
कळू दे मला सुद्धा, कशी असते ही नेमकी गुलाबी थंडी…….

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments