वेश्या – भाग ४

दोन वर्षे उलटली होती. शांताक्काला मीराकडून जो फायदा व्हायचा तो झाला होता. मीरा आता स्वतःची कमाई स्वतःकडे ठेऊ लागली होती. तिने सगळं सोडून गावाकडे परत जायचा विचार देखील केला पण कुणासाठी जायचं आणि कशासाठी? या प्रश्नाची उत्तर तिच्याकडे नव्हती. आणि यापेक्षाही यक्ष प्रश्न होता तिच्या आयुष्यात- ज्या प्रश्नाने तिला दोन वर्ष सुखाची झोप दिली नाही. डोळे उघडले की सर्वांत आधी तिच्या मनात तोच प्रश्न आ वासून उभा राहायचा.

अशोक….. त्याचा अजूनही काहीच पत्ता नव्हता.

रघ्याच्या ओळखीचा एक गिर्हाईक मीराला कॉर्पोरेशनच्या स्टॉपवरून घेऊन जायला येणार होता. आज मीरा त्याची वाट पाहत कॉर्पोरेशनच्या स्टॉपवर बसली होती. पाहत होती आजूबाजूचे लोक. फुगेवाल्याकडे पाहून घिरट्या घालणारी लहान मुले, नटून थाटून बायको म्हणून मिरवणाऱ्या बायका, कर्कश्य आवाज करीत जाणाऱ्या बसेस, गाड्या सगळं सगळं मीरा जवळून पाहत होती. ज्या जगाची ते कधीच होऊ शकत नाही ते जग पाहत होती. मीराच्या अगदी विरुद्ध दिशेला रस्त्याच्या पलीकडे एक मोठा जिना होता. जो सरळ मंगला टॉकिस कडे जात होता. मीरा ने मनाशी विचार केला, अजून थोडा वेळ वाट पाहायची आणि घरी परतायचं. जिण्याच्या सुरुवातीलाच पहिल्या पायरीवर एक फुगेवाला थांबला होता. येणारी जाणारी लहान मुलं फुग्यांकडे कौतुकाने पाहत होती. काही मुलं हट्ट करीत होती. त्यातच एक लहान मुलाने रस्त्यावरच कहर माजवला. फुग्यासाठी हट्टच धरून बसला. मीराला वाटलं, काय लोकं असतात पाच रुपड्याच्या फुग्यासाठी एवढ्या गोंडस लेकराला रडायला लावतात. तिला वाटलं पुढं जावं आणि घेऊन द्यावा त्या बाळाला फुगा. पण पुढच्याच क्षणी ती थांबली. तिने घेऊन दिलेला फुगा तिच्या आईबापाला रुचला नसता म्हणून तिने स्वतःला आवरत घेतले पण तोपर्यंत त्या बाळाच्या बापाने फुगा विकत घेतले आणि बाळाला दिला. त्या बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू मीराला सुखावून गेलं आणि तिची नजर त्या बाळाच्या बापाकडे गेली अन तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हो, तो अशोक होता! तीच बदललेल्या आयुष्यच कारण, दोन वर्षे जागून काढलेल्या रात्रीच कारण – अशोक तिची मती खुंटली होती त्याला असा अचानक पाहून. काय करावे काय नाही या विचारातच शेवटी न राहवून तिने एक जोरात हाक मारली. पहिल्या हाकेतच तिने तिचा आवाज अशोक पर्यंत पोहचवला. अशोक ने वळून पाहिलंदेखील. पण त्याने मीराला बघून ना बघितल्यागत केलं आणि पुढेच चालू लागला. तो इतक्या झपझप पुढे निघून गेला की मीरा रस्ता ओलांडे पर्यंत दिसेनासा झाला. हो, तो अशोकच होता. मीरा पुन्हा उध्वस्त झाली होती. अशोक ने अस का वागावं? ते मुलं त्याच होत? त्या रात्री काय झालं होत.. मीराला सगळं आठवलं, तूच त्याच प्रश्नानी तिला अजून एकदा भंडावून सोडलं आणि आज परत ती काहीच करू शकत नव्हती. त्या माणसांच्या गर्दीकडे ती शून्यातच पाहत राहिली तिच्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधत!

मीरा रस्ता ओलांडेपर्यंत अशोक तिथून दिसेनासा झाला होता. मीरा पुन्हा एकदा उध्वस्त झाली होती. अशोक ने असा का वागावं? त्या रात्री काय झालं झालं होत.. मीराला परत सगळ्या प्रश्नांनी भंडावून सोडलं.. मीरा त्या माणसांच्या गर्दीत शून्यात पाहत राहिली स्वतःच्या प्रश्नांची उत्तर शोधत.

मीरा खिन्न होऊन रस्त्याकडे पाहत होती. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज तिच्या मनातला गोंधळ अजून वाढवत होता. ती पुन्हा खचली होती. परिस्थितीशी लढायचं जरी ती शिकली असेल तरी नशीब अशा प्रकारे तिला वाकुल्या दाखवेल असा तिला वाटलं नव्हतं. तिला रडू येत होत आणि त्या गर्दीत तीच रडू ऐकणार कुणीच नव्हतं. तिच्या मनातला गोंधळ वाढत होता, आजुबाजुच्या गाड्यांचा आवाजदेखील वाढत होता- कोणाला काहीतरी सांगावं म्हणून तिने नूर ला फोन करण्यासाठी वळले आणि तिला पाठीवर कुणाचा तरी हात जाणवला. ती झटकन वळाली. हो, तो अशोक होता. मध्यम उंचीचा, सावळा – फॉर्मल पॅन्ट आणि फिक्कट हिरव्या रंगाचा बारीक चौकटींचा हाफ बाह्यांचा शर्ट, चकचकीत पॉलिश केलेले बूट आणि केस व्यवस्थित विंचरलेले. तिच्या आयुष्याचं उत्तर तिच्यासमोर उभं होत. जो चेहरा २ वर्षे तिने फक्त स्वप्नात पाहिला होता आज तिच्या समोर होता. तिला त्याच्यावरच्या प्रेमापेक्षा आज तिला तिच्या प्रश्नांची उत्तर हवी होती. तिच्या प्रश्नांची उत्तर ऐकायला तिने कानात जीव आणला होता.

अशोक मात्र तिच्याकडे भिरभिरल्या नजरेने पाहत होता. तिला नखशिखांत न्याहाळत होता. त्याच्या नजरेतले प्रश्न स्पष्ट होते. मीरा त्याला अशी भेटेल असा त्याने कधीच विचार केला नव्हता, कारण आता ती, ती मीरा नव्हती जी दोन वेण्या बांधून शाळेत जाताना दिसली होती – या मीराचं रूप वेगळ होत, भयानक होत. भल्या गर्दीतही स्मशान शांतता. दोघे कित्येक वेळ एकमेकांकडे नुसते पाहत होते. दोघांकडेही नजर भरून प्रश्न होते.

मिराच्या नजरेत नुसतेच प्रश्न नाही तर रागही होता, अविश्वास होता. भीती होती. तिने विचारलं त्याला, का केलंस हे सगळं? तो भांबावला होता. ती विचारत चालली होती, का केलंस हे सगळं, काय झालं होत त्यारात्री? अशोक ही त्याचीच वाट पाहत होता. तो बोलू लागला निरागसपणे जणू काही ते सगळं काल रात्रीच घडलंय –

आपण घरातून पळून निघालोय ही गोष्ट काही वेळातच वणव्यासारखी गावात पसरली. जातीचा फुसका माज असणाऱ्या माझ्या बापाला ही गोष्ट रुचली नाही. त्याने गावातली, जातीतली सगळी लोकं गोळा केली आणि आपली एसटी पुण्याला पोहचायच्या आधी त्यांनी आपल्याला गाठलं. गाडी अडवून त्यांच्यातले १० १२ जण आपल्या गाडीत शिरले आणि त्यातल्या एकाने सगळ्यात आधी तुझ्या तोंडावर कसलातरी बोळा दाबून तुला बेशुद्ध केले आणि आपल्याला त्यांच्या गाडीत बसवून निघाले. आपल्या दोघांनाही कुठेतरी लांब नेऊन संपवायचं असं त्यांचं ठरलं होत. पुण्याच्या आसपास आल्यावर माझ्या बापाचा त्यांना फोन आला, त्यांचा विचार बदलला माझ्याच बापाच्या सांगण्यावरून तुला त्यांनी हायवे च्या कडेला टाकून दिलं आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले.२ महिने स्वतःच्या घरात कैद्यासारखा राहिलो. नंतर बापाने सांगितलं की त्याने तुला मारून टाकलं. बापाने जबरदस्तीने धमकावून लग्न लावून दिलं.तू भेटायची काहीच चिन्ह दिसत नव्हती. मला माहीत होत तू कधीतरी भेटशील. आणि शेवटी तू इथे भेटलीस पण तू अशी भेटशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्या अशा असण्याला फक्त मी जबाबदार आहे. मी तुझा अपराधी आहे. तुला द्यायची ती शिक्षा मला दे.

मीराने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तिला या गोष्टीच समाधान होत की तिला इथे आणण्यामध्ये अशोक चा हात नव्हता, तीच मन कधी कधी उगाचच त्याच्यावर संशय घ्यायचं. त्यानंतर जे काय काय घडलं ते सगळं तिने अशोक ला सांगितलं. अशोक ला खूप अपराधी वाटत होत. तिच्या परिस्थितीला फक्त आपण आणि आपण जबाबदार आहोत असं त्याला वाटू लागलं. पण मीरा मात्र त्याला हेच समजून सांगत होती. त्याची काही चूक नव्हती, सगळा दोष नशीबाला देऊन मीरा त्याची समजूत काढत होती. आणि आता असंही मीराचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कुणीच करू शकत नव्हतं.

दोघांसाठीही खूप अवघड वेळ होती. भावनेच्या भरात येऊन शेवटी अशोक ने तिला गळ घातलीच, जे काय झालंय ते सगळं विसरून पुन्हा एकत्र येऊ असं तो बोलून गेला खरं पण मीरा ला माहीत होत, आता ते जग तिच्यासाठी नव्हतं आणि अशोक ला हे सगळं समजून सांगणं अवघड होत- न राहवून शेवटी अशोक च्या नजरेला नजर मिळवून बोलली, ” एकत्र येऊ?……माझ्या सोबत राहणं परवडणार नाही तुला – एका रात्रीचे हजार रुपये घेते मी” आणि तडक तिथून निघून गेली. जाताना मागे वळून देखील पाहिलं नाही तिने.

अशोक ला काय समजायचं ते समजून गेलं. आणि मीरा मात्र शांत डोक्याने चालली होती. तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती, आता एकच प्रश्न होता, डोंगराएवढं आयुष्य काढायचं कसं? उत्तरही तिच्याकडेच होत – वेश्या म्हणून… वेश्या!

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments