आज खूप नैराश्य आले आहे. माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरला नाहीये. सगळ्यांनी माझी साथ सोडली आहे. खूपच एकटे एकटे वाटत आहे. तुमच्या आयुष्यात माझी काही गरज उरली नाहीये हे मला पक्के ठाऊक आहे. मित्रांनो, ही व्यथा आहे तुमच्या आमच्याकडे असणाऱ्या लेखणीची. ह्याच्या आगोदर मी तिला कधीच एवढे खचलेल्या अवस्थेत पाहिले नव्हते. इतक्या वर्षांनी तिला तिचे मन मोकळे करायची संधी मिळतीये. आज ती लेखणी माझ्यासमोर, टेबलाच्या त्या एका टोकाला निपचिप पडलीये. स्वतःवर साचलेली धूळ झटकण्याचेही त्राण तिच्यात उरले नाहीये. माझ्याकडे आशेने बघणाऱ्या लेखणीची वेदना मला स्पष्ट जाणवतीये.

बरोबरच आहे ना मित्रांनो, ही तीच लेखणी आहे जिने तुम्हा आम्हाला बाराखडी लिहायला मदत केली, ही तीच लेखणी आहे जिने तुम्हा आम्हाला शिक्षणात पुढंपर्यंत जायला मदत केली. आपल्या शिक्षणात करिअर मध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा होता तर तो ह्याच लेखणीचा बरं… जिने स्वतःचे शरीर कागदावर घासून घासून आपल्याला घडवले. कायमच आपल्या दोन बोटांच्या आज्ञेत, आपल्या मुठीत राहणारी हीच ती लेखणी..

आज आपण ह्या लेखणीला पुरते विसरून गेलोय. ह्या तंत्रज्ञान युगामध्ये तिची किंमत अगदी शून्य करून टाकली हो आपण… विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहायला मदत करण्यापासून ते लेखकांना त्यांच्या भावना शब्दात मांडण्यापर्यंत तीच तर होती. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देयला तीच तर कामी येत होती. आज तिच्या बाबतीत आपण एवढे भावनाशून्य कसे झालो..?? गरज संपली की ती लगेच अडगळ होते का..??

मान्य आहे मला, जिची आपण दसऱ्याच्या दिवशी पूजा करायचो, तिला पाय लागला तर नमस्कार करायचो. पण हे करताना आपण आपला राग तिच्यावर अगदी हक्काने काढायचोच की.. पण म्हणून तिने कधी आपली साथ सोडली नाही… अशी ती आज इतकी हतबल, असहाय्य कशी झाली..?? तिचे आपल्या आयुष्यातील योगदान आपण विसरून गेलोय का..? आपण इतके स्वार्थी बनलोय का..??

अत्यंत कमी दरात मिळणाऱ्या ह्याच लेखणीने आपल्याला मात्र अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून दिले आहे हे आपण विसरता काम नये. आज आपण हीचा उपयोग फक्त आपले नाव टिकवण्यासाठी म्हणजेच सही साठी करतो.. पण आता थोड्या दिवसात तेही बंद होईल कारण आता तिची जागा ह्या डिजिटल सिग्नेचरनी घेतलीये. म्हणजे दोन अक्षरांपुरते असणारे हिचे आपल्या आयुष्यातील स्थान सुद्धा आपण हिरावून घेणार आहोत…

धन्यवाद

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments