माझे प्रेरणास्थान

प्रेरणास्थान हा खुपच मोठा आणि व्याप्त असा विषय आहे असे मला वाटते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणीतरी नक्कीच असते जे आपल्याला प्रेरणा देऊन जाते. कळतनकळत आपण अनेक व्यक्तींकडून किंवा लहानसहान गोष्टींकडून खूप काही शिकत असतो किंवा त्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. आपल्याला आपले प्रेरणास्थान कळणे हेच फार महत्वाचे आहे. काहींचे प्रेरणास्थान हे व्यक्तीप्रधान तर काहींचे सृष्टीप्रधान उदा. झाडे, पशू-पक्षी इत्यादी.. असे असू शकतात. माझे प्रेरणास्थान हे व्यक्तिप्रधान आहे. माझे प्रेरणास्थान आहे महाभारतातील श्रीकृष्णाचा प्रिय मित्र, सखा आणि उत्तम शिष्य असणारा अर्जुन अर्थात पार्थ..

महाभारतातील माझे सर्वात लाडके आणि प्रेरणादायी पात्र म्हणजे अर्जुन. हा अर्जुन मला बरेच काही शिकवून गेला. त्याचे चरित्र हे माझ्यासाठी अनुकरणीय आहे असे मला वाटते. लहानपणी द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकत असताना घडलेला एक प्रसंग आपल्याला माहीत असेलच. तो म्हणजे पक्षाचा डोळा फोडण्याचा.. ह्यावरून अर्जुन मला शिकवतो की आपण गुरूंकडून शिकलेल्या विद्येवर आपली निष्ठा किती दृढ हवी आणि आपल्याला साध्य करायच्या लक्ष्यावर आपली एकाग्रता कशी असावी. इथे एकाग्रतेचा अर्थ असा की, मला माझ्या जिवनातील ध्येयाशिवाय दुसरे काहीच दिसताकामा नये. ह्याचाच उपयोग अर्जुनाला महायुद्धात झाला.

मोठ्यांचा आदर कसा करायचा हे अर्जुन आणि युधिष्ठीर तसेच अर्जुन आणि भीष्मांच्या नात्यातून मी शिकलो. याच बरोबर अर्जुनाने मला, कोणत्या गोष्टी करू नयेत हे देखील शिकवले. पत्नी चा अनादर करू नये, पत्नी ही कधीही वस्तू असूच शकत नाही हे मला त्याच्या बाबतीत घडलेल्या, द्रौपदीला वस्तू संबोधण्यावरून घडलेल्या प्रसंगातुन शिकवले. कितीही अन्याय झाला तरी त्याला अधर्म हे उत्तर असू शकत नाही, हे मला महाभारतातून शिकायला मिळाले.

मित्राची व्याख्या काय..? मैत्रीचा आदर कसा राखायचा..? चांगला मित्र कसा असावा..? हे मला पार्थ आणि श्रीकृष्ण म्हणजेच वासुदेव यांच्या नात्यातून शिकायला मिळाले. अर्जुनाकडून सर्वात महत्वाचा धडा मला शिकायला मिळाला तो म्हणजे, आपल्या जीवनाचा सारथी कसा असावा ह्या विषयी. मी जे जे काही अश्या ह्या थोर महारथी अर्जुनाकडून शिकलो त्याचा महत्वाचा टप्पा म्हणजे धर्मयुद्धच्या वेळी श्रीकृष्णाने सांगितलेले श्रीमदभगवत गीता काव्य… या वेळी अर्जुनाने मला कल्याणकारी प्रश्न समोरील व्यक्तीचा मान ठेवून किती आदराने विचारायचे हे शिकवले. आजकाल समोरच्याचे ज्ञान तपासून पाहण्याच्या हिशोबाने प्रश्न विचारले जातात आणि त्याला अध्यात्मिक रंग दिला जातो. आपण एक लक्ष्यात घेतले पाहिजे, प्रश्न विचारणारा अर्जुन होता म्हणून उत्तर देणारे स्वतः भगवान होते. प्रश्न विचारायची कला मी ह्यावेळी पार्थ कडून शिकलो. त्याचबरोबर मिळणाऱ्या उत्तराचा आपल्या जीवनात कसा फायदा करून घेयचा हे देखील मला शिकायला मिळाले.

या शिवाय श्रीकृष्णांनी सांगितल्या गीतेचे अनुसरण आपल्या जीवनात करण्याचा आणि आपल्या जीवनाला धर्मक्षेत्र कर्मक्षेत्र कसे बनवू शकतो ह्याचा अंतिम आणि परम कल्याणकारी धडा मला श्रीकृष्ण प्रिय पार्थ कडून शिकायला मिळाला..

अश्या ह्या माझ्या प्रेरणास्थान अर्जुनाकडून मला खूप काही शिकायला मिळाले, मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहो. आपले कृपाशीर्वाद कायमच माझ्या बरोबर राहुदेत हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments