उपासना म्हणजे नक्की काय हो? उपासना कशी करतात? मी उपासना कशी करतो किंवा मला उपासनेसाठी कोणाची मदत होते ह्याविषयी विचार करण्याची कधी वेळच अली नाही हो. कारण मी उपासना करतो ह्यावर माझा विश्वासच नाहीये. मला हा प्रश्नच चुकीचा वाटतो. कारण उपासना करायची नसते ती होत असते. आणि जर ती योग्य मार्गाने होत असेल तर मदत करणारा पण तोच परमेश्वर असतो असे मलातरी वाटते. ह्यात भिन्न भिन्न मते असू शकतात आणि त्याचा मी आदरच करतो.

मला वाटते की शुद्ध उपासनेचे महत्वाचे अंग म्हणजे पुर्णतः समर्पण. आपल्यातला “मी” पणा बाजूला सारून केलेली उपासना हीच भगवंताला भावते ह्यात शंका नाही. त्यामुळे मी उपासना कशी करतो ह्याला काहीच अर्थ उरत नाही. उदाहरणार्थ, आई घराबाहेर पडताना आपल्या मुलाचा हात जसा काळजीने घट्ट धरून ठेवते तसेच मुलाला देखील आईवर पूर्ण विश्वास असतो, घरी सुखरूप येण्यात जसा मुलाचा मोठेपणा नसून आईची काळजी आणि मुलाचा आईवरचा दृढ विश्वास असतो अगदी तसेच आपल्या उपासकाला परमेश्वर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट धरून ठेवतो. म्हणजेच तोच आपल्याकडून उपासना करून घेतो.

जसे श्रीकृष्णाकडून गीता ग्रहण करताना अर्जुनाने केले. भगवंताचा एक एक शब्द , तसेच दोन शब्दांतील दडलेला छुपा अर्थ सुद्धा अर्जुनाने ग्रहण केला आणि नुसता ग्रहणच नाही केला तर त्याच्या साथीने धर्माला विजय प्राप्त करून दिला, ह्याला म्हणतात उपासना. श्रीकृष्णकडून त्याची नारायणी सेना मागून सुद्धा दुर्योधनाला युद्ध जिंकता आले नाही. आपण सुद्धा भगवंताकडून क्षणिक सुख मागण्यापेक्षा त्या भगवंताला आपल्या जीवनाचा सारथी करून घेणे महत्वाचे आहे आणि हे करणे म्हणजेच उपासना. भगवंतांनी गीतेमध्ये उपासनेचे म्हणजेच भगवंत प्राप्तीचे तीन मार्ग सांगितले आहेत ते आपण पाहूया. पहिला मार्ग निष्काम कर्मयोग दुसरा निष्ठावान भक्ती आणि तिसरा ज्ञानयोग.

आपण ह्या तीन मार्गांनी उपासना करू शकतो. पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की, मी कोणत्या मार्गानी उपासना करतोय? जर आपले उत्तर कर्मयोग आले तर खरंच आपली उपासना कर्मयोगाप्रमाणे चालू आहे का? आपल्या उपासनेत निष्कमता आहे का? आपण एखादा हेतू ठेवूनच कर्म करत आलोय. सर्व पूजा अर्चा झाली की आपण फलश्रुती म्हणतोच की.. खरे तर पूर्वनियोजित हेतू असल्याशिवाय आपण कोणतेच कर्म करीत नाही. समत्वभावाने सर्व कर्तव्य कर्म करणे म्हणजेच उपासना.

जर आपण भक्तियोगाने उपासना करीत असू तर मग आपली निष्ठा किती दृढ आहे हे आपल्याला तपासावे लागेल. एखाद्या महाराजांचा प्रभाव आपल्यावर एवढा का पडतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंचा त्याग करावा वाटतो. आहो आपण गुरूंचे काय घेऊन बसलोय इथे आम्ही देवपण बदलत राहतो. आपण ज्यांच्या कडून चांगले मिळेल ते ते ग्रहण करत रहावे पण निष्ठा मात्र कोण्या एकावर असावी. परंतु ही निष्ठा योग्य ठिकाणी असली पाहिजे. महाभारतात आपण दोन प्रकारच्या निष्ठा पहिल्या आहेत एक म्हणजे अर्जुनाची श्रीकृष्णवर आणि दुसरी म्हणजे कर्णाची दुर्योधनावर. दगडावर निष्ठा ठेवून त्यात देव पहिला तरी सुद्धा भगवंत प्राप्ती होतेच की.. फक्त साथ लागते ती धर्मयुक्त आणि निष्ठायुक्त भक्तीची..

आणि ज्ञान मार्गाने उपासना करणे म्हणजे ह्या सर्व आतील-बाहेरील सृष्टी कडे साक्षी भावाने पहाणे गरजेचे आहे. साक्षी भावाने पहाणे तसे आपल्याला फार अवघड आहे कारण प्रत्येक गोष्टींत आपल्याला “मी” पहायची सवय असते. मी म्हणजे माझं शरीर अशी स्वत:ची ओळख धरून आपण चालतो. पण ज्याच्या अस्तित्त्वामुळे हे शरीर जिवंत आहे त्या आत्म्याची जाणीव तो ठेवीत नाही. आपले नश्वर शरीर म्हणजेच “मी” अशी आपली भावना असते. हाच “मी” जेव्हा आपल्या नश्वर शरीराला सोडून सर्व चराचरात पहायला लागतो ती म्हणजे उपासना.

तर मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण शुद्ध उपासनेच्या मार्गावर असतील त्यांच्या प्रमाणे आपण सुद्धा भगवंतानी सांगितलेल्या उत्तम अश्या उपासनेच्या मार्गाचा अवलंब करावा ही विनंती…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments