संगीत आणि मी

तसा माझा आणि संगीताचा काही संबंध नाही आणि जर असेल तर तो ऐकण्यापुरताच आहे. आपल्यापैकी काही जणांचे बहुदा असेच असेल. आमच्या घरच्यांना थोडे फार संगीतातले ज्ञान आहे पण मी मात्र संगीताच्या बाबतीत कोरडाच राहिलो. लहानपणी फार उत्साहाने तबल्याच्या क्लास लावला होता जेवढे ताल शिकवले तेवढे पाठ पण झाले. पण माझ्या बोटांची आणि तबला डग्याची मैत्री काही केल्या होतच नव्हती. मी आमची मैत्री खूप तालात ठेवण्याचा, टिकवण्याचा अटोकात प्रयत्न केला पण शेवटी माझ्या बोटांनी तबल्याशी फारकत घेतलीच.. आणि मी हेच माझ्या घरच्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. जाऊदे म्हणालो आणि माझ्या कामात गुंतलो..

काही दिवस गेल्यावर माझी बहीण आमच्याकडे आली होती. ती संगीत विशारद आहे. आता तिला हे कळल्यावर ती काय गप्प बसणार होती?? ती आमच्या घरच्यांना म्हणाली की ह्याची बोटे तबल्याची नाहीत तर कीबोर्ड किंवा पेटीची आहेत.. पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात नवीन मित्र येणार होता. मी, हो नाही करता करता कीबोर्ड शिकायचा क्लास लावला. पहिल्यावेळेस कीबोर्ड पाहिल्यावर वाटले की एवढी बटणे वाजवण्यापेक्षा आधीचा तबलाच बरा होता.. पण आता सांगणार कोणाला..?? काही दिवस असेच चालू राहिले आणि नंतर हळू हळू कळायला लागले की कीबोर्ड चे आणि माझे सूर काही जुळायचे नाव घेत नाहीत.. मला सर्वत्र ब्लॅक अँड व्हाइट दिसत होते.. झाले मी परत घरच्यांची बोलणी खायला मोकळा झालो.. आणि आता परत कोणत्याही वाद्याचा क्लास लावायचा नाही हा पण करून मी पुन्हा माझ्या शालेय जीवनात मग्न झालो..

माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मी माझ्या करिअर मध्ये पुरता अडकलो. संगीत वगैरे सगळे डोक्यातून निघून गेले. आज तुम्हाला हे सांगायचे कारण म्हणजे आज साधारण 20-22 वर्षांनीं आमच्या घरात एक पाहुणी आली. तुम्ही ओळखले असेलच. ती पाहुणी म्हणजे बाजाची पेटी. ती सुद्धा एका प्रतिष्ठित व्यक्तीने घरच्यांना शिकण्यासाठी दिलेली. माझ्या घरचे आणि मी माझ्या आयुष्यात संगीताच्या बाबतील घडलेले पूर्णपणे विसरलो होतो. पण पेटी पाहिल्यावर एकदम आठवण झाली. आता मला कोणी क्लास लाव म्हणून म्हणणार नव्हते.

आता हा लॉकडाऊन चा काळ सुरू झाल्यावर मला नाईलाजाने घरीच थांबावे लागले. आता वेळ कसा घालवायचा म्हणून जरा पेटी वाजवायला बसलो.. मला साधे सा रे ग म पण वाजवत येत नाही. पण मला माझ्या आईने थोडे फार शिकवले. आणि मी सुद्धा वेळ घालवण्यासाठी शिकत होतो. नंतर मला ह्याचा काही उपयोग होणार नाही ह्या खात्रीने. सहज युट्युबवर एक व्हिडियो पहिला त्यात आपल्या राष्ट्रगीताचे नोटेशन होते. मला बेसिक माहीत नसल्याने नोटेशन चा काही उपयोग झाला नाही पण त्यांनी व्हिडीओ मध्ये ज्या पद्धतीने वाजवले आहे तसा मी प्रयत्न करून पहिला..

साधारण 10 ते 15 प्रयत्नानंतर मला सुरवातीचा काही भाग जमायला लागला होता.. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला माहीत होते की हे शास्त्रीय नाही म्हणून तरी मी माझ्या आनंदाला लपवू शकत नव्हतो.. आता जवळपास अर्ध्याहून अधिक राष्ट्रगीत वाजवता येयला लागले आहे.. पेटीवर बोटे अजून रुळली नाहीत पण काहीतरी वाजवणे चालू आहे. पण आज मात्र मला एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळत आहे. मी पेटी वाजवताना एका वेगळ्याच विश्वात हरवून जात आहे.. आज मला संगीताचा खरा आणि निखळ आनंद मिळत आहे. आज माझे सूर माझ्याही नकळत पेटीच्या सुरात मिसळत आहेत. शेवटी संगीत आपल्या मनाला आनंद देण्यासाठीच असते नाही का??

विशेष म्हणजे आज मला कोणी क्लास लाव म्हणून म्हणणारे नव्हते पण मी आपसूकच संगीताकडे वळलो अगदी अलगदपणे, कोणाच्याही दबावाखाली नाही तर फक्त माझ्या आनंदासाठी. ह्या वाद्याच्या रूपाने आज मला खूप चांगला मित्र मिळाला आहे. आज मला कळले जर आपण काहीही न शिकता एवढा आनंद मिळतोय तर ते वाद्य शिकून किती मिळेल… असो ह्या मित्राची साथ कधीही सोडायची नाही असा निश्चय करून मी पुढे जाणार आहे..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments