वार्षिक परीक्षा

नमस्कार, वार्षिक परीक्षा हा विषय जरी काढला तरी आजून धस्स होत ना? पण मित्रांनो मी आज ज्या परीक्षेबद्दल बोलणार आहे ती आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा नव्हे, तर ही आहे आपल्या जीवनाची वार्षिक परीक्षा.

आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे त्या भगवंतानी ठेवलेली आपल्या आयुष्याची वार्षिक परीक्षा आहे असे मला वाटते. ह्या परीक्षेची तारीख त्यानी अगोदरच ठरवून ठेवली आहे त्या प्रमाणे त्या परीक्षेचे नियम सुद्धा.

आता नियम कोणते आणि ह्यात गुण पद्धती कशी असणार आहे ते आपण पाहू. भगवंतानी ही ठेवलेली परीक्षा ही आपल्या शिक्षणाच्या परिक्षेसारखी नाही बरं. पण एक साम्य आहे, ते म्हणजे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होणे. ह्या वर आपण पुढे बोलूच सविस्तरपणे, पण आगोदर आपण समजून घेऊ की ह्या परीक्षेचा अभ्यास कोणता असतो आणि तो कसा करायचा..

ह्या परीक्षेचा अभ्यासबद्दल आपण सर्वजण परिचित आहोत. ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा धडे म्हणजे दया, क्षमा, शांती, भगवंताचे चिंतन, ध्यान धारणा, नामस्मरण इत्यादी… थोडक्यात राग, लोभ, निंदा, मत्सर इत्यादी आणि असे अनेक दुर्गुण सोडून सद्गुणांचे आचरण करणे. आता तुम्ही विचाराल की ह्याचा अभ्यास कसा करायचा? तर ह्याचे उत्तर आहे की ह्याचा अभ्यास आपण लहानपणापासून करत आलोय, आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींनी, आपल्या आई-वडिलांनी ह्याचे धडे देयला सुरवात ही आपल्या लहानपणापासूनच केलीये. पण आपण आज पर्यंत हे धडे फार गांभीर्याने घेतले नाहीत. खरे आहे ना?? आपण हे विसरूनच गेलोय की आपल्याला आपली या जन्माची वार्षिक परीक्षा ह्याच अभ्यासक्रमावर देयची आहे. आपण हा अभ्यास व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे केला तरच शेवटच्या घडीला आपल्याला भगवंताचे समरण होऊ शकेल आणि आपण आपली शेवटची प्रश्नपत्रिका शांततेत तसेच वेळेत सोडवू शकतो.

आपल्या शाळेत वार्षिक परिक्षेआधी छोट्या चाचणी परीक्षा होयच्या अगदी तश्याच परीक्षा आपण आज सुद्धा देतोय. ह्या चाचणी परीक्षा म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी असे म्हणता येईल. वर सांगितलेले सद्गुणांचे धडे गिरवून वेगवेगळ्या अडचणींवर मात करता येऊ शकते आणि आपण चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो. ह्या सर्व चाचणी परीक्षेचे आणि वार्षिक परीक्षेचे मिळून सरासरी गुण काढून आपण उत्तीर्ण होणार की अनुत्तीर्ण ते ठरणार आहे. ह्या परीक्षेचा निकाल हा फक्त उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण एवढाच असेल. जर आपण उत्तीर्ण झालात तर भगवंत प्राप्ती आणि अनुत्तीर्ण झालात तर परत ह्याच वर्गात बसावे लागेल म्हणजेच परत ह्याच जीवनचक्रात अडकण्यासारखे असेल. मग परत त्याच-त्याच परीक्षा पुन्हा सुरू होतील. त्यामुळे आपल्याला सर्व चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होत पुढे जायला हवे म्हणजे आपली सरासरी चांगली राहून वार्षिक परीक्षेत आपण सर्व जण उत्तीर्ण होऊ शकतो.

आता काही जण म्हणतील की, आम्ही फक्त वार्षिक परीक्षेच्या काही दिवस आगोदर अभ्यास करून उत्तीर्ण होऊ शकतो का? तर ते शक्य नाही कारण ह्या जीवनाच्या वार्षिक परीक्षेची तारीख म्हणजेच आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस की जो आपल्याला माहीतच नाही. ती तारीख फक्त त्या भगवंतालाच माहीत आहे. आहो हीच तर गंम्मत आहे ह्याची. त्याच्या मुळे आयुष्यभर अभ्यास करावाच लागणार. नाहीतर आपल्या प्रगती पुस्तकावर म्हणजेच आपल्या नशिबावर येणारा त्याचा शेरा काय असेल ह्याची आपल्याला कल्पना आहेच.

तर मंडळी, आपण सर्वांनी आजच नव्हे तर या क्षणापासून अभ्यासाला सुरवात करायला हवी. म्हणजे आपण भगवंताच्या वार्षिक परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण होऊ आणि भगवंत प्राप्ती करून घेऊ..

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Aditya

Best